फसव्या विमा पोलीसींचा सापळा
गुंतवणूक आणि आयुर्विमा? नाही, कधीच नाही!
गेल्या आठवड्यात आपण बघितलं की एन्डोमेंट किंवा मनी-बॅक सारख्या पारंपारिक आयुर्विमा पॉलिसी आपल्याला कधीच पुरेसं विमा संरक्षण देऊ शकत नाहीत. बहुतांशी त्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करबचतीसाठी म्हणून विकल्या जातात. ह्या पॉलिसी गळ्यात बांधण्यासाठी जे दीर्घकालीन गुंतवणूक आणि आकर्षक परताव्याचे गाजर आपल्याला दाखवले जाते त्याचा परामर्ष घेऊ.
जेव्हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड चांगला की आयुर्विमा पॉलिसी चांगली असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा बऱ्याचदा लोक बाळबोध विचार करतात. बाजारात जे जास्त विकलं जातं, जे जास्त लोकप्रिय आहे, ते अर्थातच जास्त चांगलं असणार. तेव्हा आयुर्विमा पॉलिसी ह्या नक्कीच जास्त चांगल्या असल्या पाहिजेत. म्युच्युअल फंड? नको रे बाबा! ते स्वतःच ओरडून सांगतात की ते रिस्की आहेत, त्यात जोखीम आहे म्हणून. कशाला त्यांच्या मागे लागा?
पुरेसं विमा संरक्षण न मिळूनही असंख्य लोक आजही या पारंपारिक आयुर्विमा पॉलिसी विकत घेताना दिसतात. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून त्या चांगला परतावा देऊ शकतात का? त्याचेही उत्तरं नाही असेच आहे. पण मग आयुर्विमा पॉलिसी एवढ्या लोकप्रिय का आहेत?
ह्या कोड्याचं उत्तर एकाच शब्दात देता येईल – कमिशन!
होय! एखादा म्युच्युअल फंड वितरक जेव्हा गुंतवणूकदाराला एखाद्या स्कीम मधे गुंतवणूक करवून देतो तेव्हा त्याला सुमारे ०.७% कमिशन मिळते. म्हणजेच तुम्ही एक लाख रुपये गुंतवल्यास वितरकाला रू ७०० मिळतात, आणि ते सुद्धा एकदम नाही, तर पुढील वर्षभरात.
मात्र जो एन्डोमेंट किंवा मनी-बॅक सारखी पारंपारिक आयुर्विमा पॉलिसी विकतो त्याला पहिल्या वर्षी ४२% पर्यंत कमिशन मिळू शकते. म्हणजेच तुम्ही जर रू १००,००० प्रीमियमचा हप्ता भरलात, तर त्यातले रू ४२,००० एजंटच्या खिशात जातात. त्यानंतर ५व्या वर्षापर्यंत त्याला ७.५% कमिशन मिळते आणि ६व्या वर्षापासून पुढे ५% मिळत राहते.
कमिशनचे हे आकडे वाचून जर तुम्हाला धक्का बसला असेल, तर एक लक्षात घ्या, हे आकडे गेल्या वर्षी IRDAने कमिशन घटवल्या नंतरचे आहेत. त्या आधी हे अजून जास्त होते.
साहजिकच आहे की आजमितीला गल्लोगल्ली आयुर्विमा विक्रेते पसरलेले आहेत. मार्च २०१८ मधे भारतात २०.८ लाख आयुर्विमा एजंट कार्यरत होते. तर भारतीय म्युच्युअल फंड असोसिएशन (AMFI)कडे अवघे १ लाख नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक आहेत. म्हणजेच भारतात प्रत्येक एका म्युच्युअल फंड वितरकापाठी किमान २० आयुर्विमा एजंट कार्यरत आहेत. आपल्या प्रत्येकाच्याच नात्यात, ओळखीत, मित्रपरिवारात, शेजारपाजारात कोणी ना कोणी विमाविक्रेता असतोच. त्यांना कंपनीपुरस्कृत कार्यशाळांमधून पद्धतशीररित्या जास्तीत जास्त प्रीमियमवाल्या पॉलिसी कशा विकाव्यात याचे प्रशिक्षण दिलेले असते. बहुतेक सामान्य लोक गुंतवणूक करायची वेळ आली की अशा विक्रेत्यांची मदत घेतात आणि आपसूक त्यात अडकून पडतात. साहजिकच त्यांच्या मनात म्युच्युअल फंड म्हणजे एक बागुलबुवा आणि आयुर्विमा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनु अशी प्रतिमा न बनते तरच नवल.
गुंतवणूकदाराच्या प्रीमियममधून असे भरघोस कमिशन विक्रेत्यांना देणारी कुठलीतरी योजना एक गुंतवणूक म्हणून चांगला परतावा मिळवून देऊ शकेल का? अर्थातच नाही!
ह्या पारंपारिक विमा पॉलिसी विकताना त्या आकर्षक वाटाव्यात म्हणून विमाविक्रेते काही फसवी आकडेमोड करून दाखवतात. उदाहरणार्थ, वाचणारा टॅक्स म्हणजे उत्पन्न असं दाखवून परतावा मोजतात. त्यामुळे ३०% जास्तीचा परतावा मिळण्याचा आभास निर्माण होतो. विमा घेताना किंवा दीर्घकालीन आर्थिक नियोजन करताना टॅक्स आपण इतरही अनेक मार्गांनी वाचवू शकतो, ते आपले प्राथमिक उद्दिष्ट नसते.
दुसरी गोष्ट म्हणजे विमापॉलिसीवर भविष्यात मिळणारा सगळा परतावा पूर्णपणे जोखीममुक्त आणि खात्रीलायक मिळेल असे भासवले जाते. मात्र ह्यातील बव्हंशी पॉलिसीमधे आपण २०-२५ वर्षे भरलेल्या प्रीमियमची रक्कमच फक्त मुदत संपल्यावर आपल्याला मिळण्याची खात्री असते. बाकी परतावा गॅरंटीड बोनस, प्रत्यावर्ती बोनस, लॉयल्टी बोनस, मुदतपुर्तीचा बोनस वगैरे नावांखाली मिळणार असतो. प्रत्यक्षात हे सगळे बोनस विमा कंपनीच्या कामगिरीवर आणि नफ्यावर अवलंबून असतात.
आतापर्यंतचा इतिहास बघितला तर सर्व प्रकारचे बोनस पकडून कुठल्याही पारंपारिक जीवनविमा पॉलिसीवरील वार्षिक परतावा ७.५-८%च्या वर कधी गेलेला नाही. बऱ्याचदा तो ४-५% एवढाच असतो असे दिसून येते. विमा कंपनी आपल्याकडून मिळालेल्या प्रीमियम रकमेतून एजंट कमिशन, मॉर्टॅलीटी चार्जेस, इतर खर्च वजा करून उरलेली रक्कम सरकारी कर्जरोख्यात गुंतवत असते. हे कर्जरोखे महागाईदरापेक्षा सुमारे ०.५-१% अधिक व्याज देतात. त्यामुळे ८%च्या वर परतावा जाणे हे अशक्य असते.
सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ह्या पारंपारिक विमा पॉलिसी मगरीच्या जबड्यासारख्या असतात. मगरीच्या आत वळलेल्या दातांमुळे एकदा सापडलेले भक्ष्य जसे बाहेर पडू शकत नाही, तसेच एकदा पारंपारिक विमा पॉलिसी घेतली की त्यातून बाहेर पडायची इच्छा जरी झाली तरी एवढे मोठे नुकसान सहन करावे लागते की गुंतवणूकदार त्याचं धाडस करू शकत नाही.
सर्वसाधारणपणे अशा पॉलिसी बंद करून बाहेर पडायचे झाल्यास पहिल्या वर्षीच्या प्रीमियम मधील एक पैसाही आपल्याला परत मिळणार नसतो. पुढील २ वर्षे प्रीमियम भरले असल्यास त्यातील ७०% रक्कम कापून केवळ ३०% रक्कम परत मिळू शकते. म्हणजेच रू १ लाख प्रीमियम भरणाऱ्या व्यक्तीला एक वर्षानंतर पॉलिसी थांबवायची झाल्यास पूर्ण रू १ लाखावर पाणी सोडावे लागते, आणि ३ वर्षांनतर थांबवायची झाल्यास भरलेल्या रू ३ लाख प्रीमियम पैकी फक्त रू ६०,००० परत मिळणार असतात. त्यामुळे जरी कुठलेही बोनस मिळणार असले तरी २५-३० वर्षांच्या पॉलिसी मधे पहिली १२-१५ वर्षे गुंतवणूकदाराला काहीच परतावा मिळालेला नसतो, उलट प्रचंड नुकसानच झालेले असते.
ह्या पार्श्वभूमीवर आपण हे सहज पडताळून बघू शकतो की १२-१५ वर्षे अगदी अतिसामान्य (उत्कृष्ट नव्हे!) कामगिरी असलेल्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करणारी कुठलीही व्यक्ती भारतीय म्युच्युअल फंडांच्या इतिहासात कधीही नुकसानीत गेली नसती. किंबहुना तिने वार्षिक ८-१०% हून जास्तीचा परतावा मिळवला असता.
तरीसुद्धा जर कोणाला विमाविक्रेत्यांची आकडेमोड भुरळ घालत असेल तर त्यांच्यासाठी एक सुलभ अंदाज कोष्टक देत आहे. आजपासून २०,२५,३० वर्षांनी आपल्याला मिळू शकणाऱ्या रकमेचे ७-७.५% महागाई धरून आजमितीचे मूल्य किती त्याचे हे कोष्टक.
किती वर्षांनंतर |
आजमितीला त्याचे मूल्य किती धरावे? |
५ |
७०% |
१० |
५०% |
१५ |
३५% |
२० |
२५% |
२५ |
१८% |
३० |
१२% |
म्हणजेच, २५ वर्षांनी रू ५० लाख मिळणार असतील, तर त्याची आजघडीची किंमत केवळ १८% किंवा रू ९ लाख आहे. दुसऱ्या शब्दात, आज आपल्याला रू ९ लाख जितके महिने पुरतील तितकेच महिने २५ वर्षांनंतरचे रू ५० लाख पुरणार आहेत. आज आपला मासिक खर्च रू ५०,००० असेल तर रू ९ लाख केवळ दीड वर्षात संपतील. तसेच २५ वर्षांनंतरचे रू ५० लाख त्यापुढच्या दीड वर्षात संपून जातील. गुंतवणूक म्हणून ह्या विमा पॉलिसी कशा फोल आहेत हे आपण सहजी बघू शकतो.
त्यामुळे आयुर्विमा आणि गुंतवणूक ह्यांची सरमिसळ केल्याने ना धड पुरेसं विमासंरक्षण मिळत आणि ना धड परतावा मिळत ह्याची पक्की खुणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली पाहिजे. जर कोणी विमा विक्रेता फारच जवळच्या नात्यात किंवा मित्रपरिवारात असला, तर त्याच्या किंवा तिच्या वाढदिवसाला घसघशीत भेटवस्तू घेऊन द्या, पण कुठल्याही गुंतवणूकयुक्त विमापॉलिसीला ठाम नकार द्या.
---- प्राजक्ता कशेळकर